पुणे – कोरोना विषाणूने बाधित फुफ्फुसांना सक्षम करण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेमडेसिव्हिरच्या परिणामकारकतेवर अशा प्रकारे शिक्कामोर्तब करणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही मराठी महिला शास्त्रज्ञ आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरात ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत डॉ. अपूर्वा मुळे यांनी हे संशोधन केले आहे.
अत्यवस्थ रुग्णांच्या (क्रिटिकल) उपचारासाठी रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात येतो. नुकतेच ‘सेल रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत यासंबंधी डॉ. मुळे यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. सार्स कोव्हिड -२ हा विषाणू रक्तात ऑक्सिजन पाठविणाऱ्या फुफ्फुसातील भागावरच हल्ला करत असल्याचेही या संशोधनातून पुढे आले आहे. डॉ. मुळे यांच्यासोबतच डॉ. बॅरी स्ट्रिप यांटा संशोधनात सहभाग आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या डॉ. मुळे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ब्रिटनच्या शेफिल्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण व पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत पोस्टडॉक पूर्ण केले आहे.
संशोधनाचे फायदे
कोरोना विषाणूंचा आणि रेमडेसिव्हिरचा प्रत्यक्ष फुफ्फुसावर होणारा परिणाम तपासता आला
कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची याद्वारे चाचणी करणे शक्य
भविष्यात श्वसनाशी निगडित येणाऱ्या साथींसंबंधी संशोधन करता येईल
कोरोनाशी निगडित औषधांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या. रेमडेसिव्हिरमध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले. भविष्यातही अशा आजारांशी निगडित संशोधन करण्यासाठी विकसित केलेल्या या मॉडेलचा वापर करता येईल.
– डॉ. अपूर्वा मुळे, संशोधक, सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर, लॉस एंजलिस, अमेरिका
संशोधनाच्या मर्यादा
फुफ्फुसांच्या पेशींची वाढ करून त्यावर कोराना विषाणू आणि औषधांची चाचणी घेण्यात आली आहे. पर्यायाने रेमडेसिव्हिरची परिणामकारकता प्रत्यक्ष रुग्णांमध्ये थोडीफार बदललेली असू शकते. तसेच, आजवरचे बहुतेक शोधनिबंध रेमडेसिव्हिर हे अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णाला उपयोगी असल्याचे सांगतात. मात्र, ते किती आणि कसे द्यावेत, त्याचे साइड इफेक्ट काय असतील, प्रत्यक्ष रुग्णावर काय परिणाम होतो, आदी विषयांबद्दल वैज्ञानिक समुदायात अजूनही भिन्न मते आहेत.
असा झाला अभ्यास
प्रौढ वयाच्या मानवी फुफ्फुसातील पेशींचे प्रयोगशाळेत संवर्धन करण्यात आले
त्यासाठी आवश्यक सर्व वातावरण पुरविण्यात आले
या पेशींवर सार्स कोव्हिड -२ या विषाणूंचा परिणाम अभ्यासण्यात आला
रेमडेसिव्हिर, इंटरफेरॉन बी आदी औषधांची परिणामकारकता तपासण्यात आली
निष्कर्ष
कोरोनाचा विषाणू मानवी फुफ्फुसातील पेशींना मारतो
ऑक्सिजन रक्तात पाठविण्याची प्रक्रिया कोरोना विषाणूंमुळे कमी पडते
रेमडेसिव्हिर हे औषध फुफ्फुसातील विषाणूची वाढ रोखण्यास सक्षम
अत्यवस्थ रुग्णाच्या फुफ्फुसातील पेशींची क्षमता वाढविण्यासाठी रेमडेसिव्हिर प्रभावी असल्याचे दिसते