राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला

राज्यातील आशा वर्कर्स चा संप अखेर मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कोरोना काळात सेवाभत्ता वाढवून मिळावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स संपावर गेलेल्या होत्या. याशिवाय त्यांच्या इतरही काही मागण्या होत्या. राज्यभरातील आशा वर्कर्स नी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या. आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये चर्चेच्या अंती निर्णय झाला. एक जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच आशा वर्कर्सना 500 रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच, एकूण 1500 रुपये एक जुलैपासून आशा वर्कर्सना देण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.तसेच इतर मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*