भूकंपाने पालघर पुन्हा हादरले, डहाणू, तलासरी भागांतील घरांना तडे

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सतत सुरु आहे. आज पाघरमधील तलासरी, डहाणू भागांत ३.७ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असल्याने नागरिकांमध्ये पून्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू, बोर्डी, घोडवड, तलासरी, चारोटी भागात सकाळच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले आहेत.

आज सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का डहाणू, तलासरी भागांत जाणवला. त्यानंतर पुन्हा चार मिनिटांनी म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला आहे. या दोन भूकंपाच्या धक्क्यामुळे या परिसरांतील शेकडो घरांना तडे गेले आहे. परंतु सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेले नाही. पालघरमध्ये सतत सुरु असणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आत्तापर्यंत हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या भूकंपाच्या धक्क्याने अनेक नागरिकांनी काही काळ घराबाहेर थांबवणेच पसंत केले.

गेल्या काही महिन्यांमध्ये हे भूकंपाचे सत्र थांबल्याचे जाणवत होते, मात्र आज पुन्हा भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, कासा, चारोटी, कवाडा या परिसरांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या बाबत सध्या भूगर्भीय अभ्यास सुरु असून प्रशासनाने या भागांतील इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुतीकरणाचे निर्देश दिले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*