रत्नागिरी : महाराष्ट्रातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत कोकण महसूल विभाग अनेक अर्थाने खूप वेगळा आहे. झएकाच वेळी सागरी, डोंगरी, औद्योगिक आणि अधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश, म्हणून कोकणाचा समावेश होतो. मुंबई शहर आणि उपनगर हेही कोकण विभागात येतात. मुख्यत: कोकणात जून ते सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो. आणि याच काळात अनेक नैसर्गिक आपत्तीना तोंड द्यावे लागते. यासाठी कोकण विभाग सज्ज झाला आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला खूप अगोदरपासून तयारी करावी लागते. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नुकतीच या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन कोकण विभागाची तयारी कशी आहे. याबद्दल माहिती जाणून घेतली. आणि आवश्यक त्या उपाययोजना देखील सूचविल्या. येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे. तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील, याची काळजी घ्यावी. हवामान विभागाकडून पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पूर्वतयारी केली आहे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्यांचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यन्वित आहेत.