करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून पुढील आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे पुढील संपूर्ण आठवडा न्यायालयाचे कामकाज होणार नाही. पुढील आठवड्यात सोमवारी (१२ एप्रिल) न्यायालयाने सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवारी गुढीपाडव्याची तर बुधवारी आंबेडकर जयंतीची सुटी आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पुढील आठवड्यातील उर्वरित तीन दिवसांचे कामकाजही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ न्यायमूर्तींच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. या तीन सुट्ट्यांऐवजी १९ जून ३ व १७ जुलैला न्यायालयाचे कामकाज होईल. दरम्यान, बुधवारपासून मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे कामकाज प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीने चालवण्यात येणार आहे. दिवाणी प्रकरणांची ऑनलाइन व फौजदारी प्रकरणांची सुनावणी प्रत्यक्ष पद्धतीने चालवण्यात येणार आहे.