रत्नागिरी दि. 24 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 09.15 वाजता राज्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री आणि रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी ही माहिती दिली.या संदर्भात पूर्वतयारीचा आढावा त्यांनी एका बैठकीत घेतला.
मुख्य शासकीय सोहळयाला गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतराचे नियम तसेच मास्क आणि सॅनिटायझरचे नियम सर्वांनी पाळावे असे श्री. खांडेकर म्हणाले. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे प्रभात फेऱ्या वा इतर प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाहीत.
या दिवशी सकाळी 08.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 08.30 च्या पूर्वी किंवा 10.00 च्या नंतर करावा,असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.