गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यावर करोनामुळे करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचे सावट आहे. आज चंद्रदर्शन झाले तर उद्यापासून (१४ एप्रिल) एक महिन्याच्या उपवासांना सुरवात होणार आहे. इतर सण-उत्सवांप्रमाणेच रमजान महिन्यासाठीही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. धार्मिकस्थळी अगर रस्त्यावर गर्दी न करता घरातच सण साजरा करण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आल्या आहेत. मुस्लिम धर्मात हा महिना पवित्र मानला जातो. यामध्ये महिनाभर उपवासासोबत विविध धार्मिक कार्यक्रमही असतात. मात्र, यावर्षीही ते गर्दी टाळून करण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला करोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता दक्षता घेण्याची अवश्यकता असल्याने या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.