परीक्षाही ऑनलाइनच!; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागाचे स्पष्टीकरण

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात फक्‍त ऑनलाइन पद्धतीने आणि बहुपर्यायी प्रश्‍न (एमसीक्‍यू) पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा शंभर टक्‍के अभ्यासक्रमावर होणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूून स्पष्ट करण्यात आले.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी आज परीक्षा पद्धतीचे स्वरुप प्रसिद्ध केले. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास उर्वरित राहिलेलाच वेळ विद्यार्थ्यांना सॉप्टवेअर मार्फत आपोआप वाढवून देण्यात येईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही आपोआप सेव्ह होऊन परीक्षा पुन्हा राहिलेल्या वेळासाठी सुरू राहील. ऑनलाइन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे कळविले जाईल. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्‍यक आहे. या परीक्षांसाठी छायांकित प्रत व फेरमूल्यांकनाची सोय नसल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

तक्रारीत तथ्य असेल, तरच फेरपरीक्षा

ऑनलाइन परीक्षेदरम्यान काही अडचणी निर्माण झाले असेल तर तक्रार दाखल करता येईल. लॉग-इन न होणे, अचानक लॉग-आऊट होणे, पुन्हा लॉग-इन न करता येणे, इंग्रजी अथवा मराठी प्रश्‍नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, चुकीच्या प्रश्‍नपत्रिका उपलब्ध होणे, पेपर सबमिट न होणे, कोविड बाधा अथवा नैसर्गिक आपत्ती, एकाच दिवशी एकाच वेळी दोन विषयाची परीक्षा, अशा तक्रारी पुराव्यासह विद्यार्थ्यांनी दाखल करावी. अर्जाची छाननी करून त्यात तथ्य असेल तरच त्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

शंभर टक्‍के अभ्यासक्रमावर होणार परीक्षा : एक तासाचा वेळ

अशी होईल परीक्षा

नियमित व अनुषेषित, बहि:स्थ, श्रेणीसुधार इत्यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा होतील.

परीक्षेसाठी 60 बहुपर्यायी प्रश्‍नांमधून 50 अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.
विज्ञान, प्रथम वर्ष बीसीए (सायन्स) आणि अभियांत्रिकीतील गणित व संख्याशास्त्र या विषयासाठी 30 प्रश्‍न विचारले जातील व त्यामधील 25 अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरले जातील. विद्यार्थ्याने प्रत्यक्ष लॉग-इन केल्यावर प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा कालवधी असेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*