रत्नागिरी -भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहिणारे रत्नागिरीचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नांव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे कीर कुटुंबीय आणि निकटवर्तीय व्यक्तींकडून स्वागत करण्यात येत आहे. धनंजय कीर यांचे पुत्र डॉ. सुनीत कीर, नातू डॉ. शिवदीप कीर, ‘मुंबई दूरदर्शन’चे माजी सहाय्यक संचालक जयु भाटकर, कीर चरित्राचे लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि कीर यांची नात डॉ. कामायनी सुर्वे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. यासंबंधी आवश्यक ती पावले तातडीने उचलल्याबद्दल त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धन्यवाद दिले.
ऑक्टोबर 2020 मध्ये जयु भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धनंजय कीर यांचे नांव विद्यापीठ उपकेंद्राला देण्याची मागणी केली, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने हा विषय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवून श्री. भाटकर यांना तसे कळविले. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात भाटकर यांनी ही मागणी केल्याचे वृत्त जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. दरम्यान, अशा नामकरणाची मागणी करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनीही पत्रकारांना दिली. धनंजय कीर यांच्या रत्नागिरी शहरातील घराजवळच राहणारे जयु भाटकर यांना लहानपणापासून या लेखकाबद्दल कुतूहल वाटे. रत्नागिरीच्या ‘आकाशवाणी’ केंद्रात निवेदक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी आपले सहकारी महेश केळुसकर यांच्या सहकार्याने कीरांची मुलाखतही घेतली होती.
अनेकांनी मागणी करूनही ज्या विद्यापीठाने धनंजय कीरांना सन्मान्य डीलिट देण्याचा निर्णय घेतला नाही, त्याच मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नांव देण्याचा ठराव त्याच विद्यापीठाने संमत केला हे उशिरा का होईना, चरित्रकार धनंजय कीर यांच्या योग्यतेवर मुंबई विद्यापीठाने केलेले शिक्कामोर्तब आहे अशा शब्दांत कीर यांचे चरित्र लिहिणारे मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले.