ओमिक्रॉन कोविडचा उत्क्रांत विषाणू रोखण्याचे जिल्हयासमोर आव्हान: जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील

रत्नागिरी दिनांक 29: कोविड विषाणूचा ओमिक्रॉन हा उत्क्रांत प्रकार अतिशय झपाटयाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी आणि याचा जिल्हयात शिरकाव होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेसह इतर काही देशात हा विषाणू आढळून आला आहे. याची पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन जगभरात उपाय योजले जात आहेत. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की आपल्या आसपास बाहेरील देशातून गेल्या 21 दिवसात कोणी आलेले असेल तर त्याची माहिती नागरिकांनी जिल्हयाधिकारी कार्यालयाच्या नियत्रंण कक्षास 02352-222233 या क्रमांकावर द्यावा. नागरिकांनी जिल्हयात लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पहिली लस घेणाऱ्यांचे प्रमाण 88 टक्के तर दोन्ही लस घेणाऱ्यांचे प्रमाण 48 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यांनी पहिली लस घेतली नाही त्यांनी ती तत्काळ घ्यावी असेही ते म्हणाले. लस घेणाऱ्यांना कोरोना होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळेच आपण यातील मृत्यू नियंत्रणात ठेवू शकलो आहोत. सर्व लसीकरण केंद्रावर लसींची उपलब्धता असून नागरिकांनी कुठलाही विलंब न करता लसीकरण करुन घ्यावे असेही ते म्हणाले. ज्येष्ट नागरिक तसेच सहव्याधी रुग्ण आणि लहान बालकांनी गर्दीत जाण्याचे टाळावे तसेच आजारपणांची लक्षणे वाटल्यास शासकीय रुग्णालयात जाऊन स्वत:ची आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी योग्य पध्दतीने मास्कचा वापर, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर आदिंचे पालन देखील न चुकता करण्याची आवश्यकता आहे. सोबतच विनाकारण गर्दी करणे, गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ फिरणे, आदि प्रकारही सर्वांनी टाळावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*