मुंबई – लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.