दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे नुकतीच शिक्षक-पालक सहविचार सभा शालेय समितीचे अध्यक्ष रविंद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेत इयत्ता दहावीच्या प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
प्रथम क्रमांक मिळवणारी जानवी सुभाष रसाळ हिला वत्सला घांगुर्डे शिष्यवृत्ती, मधुसूदन लक्ष्मण करमरकर शिष्यवृत्ती, मधुसूदन लक्ष्मण करमरकर यांच्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ ५,००० रुपये, कै. भिकाजी शंकर साठे स्मरणार्थ १,००० रुपये आणि स्मिता सुर्वे यांच्यावतीने १,००० रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळवणारी प्राजक्ता राजेश झाटे हिला कै. भिकाजी शंकर साठे शिष्यवृत्तीअंतर्गत ७५० रुपये आणि स्मिता सुर्वे यांच्यावतीने ३०० रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय क्रमांक मिळवणारी आर्या मंगेश आग्रे हिला कै. भिकाजी शंकर साठे स्मरणार्थ ५०० रुपये आणि स्मिता सुर्वे यांच्यावतीने २०० रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
याशिवाय, राष्ट्रीय स्तरावरील लाटी काठी आणि दांडपट्टा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या श्रेया येसवारे, श्रुती झाटे, आदिती काष्टे, श्रावणी काष्टे आणि प्रियल झाटे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या सभेत मेघना चितळे यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि सुजाण पालकत्व याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. शालेय समितीच्या सदस्या स्मिता सुर्वे यांनी पालकांनी आपल्या पाल्यांबाबत जागरूक कसे राहावे याविषयी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक अर्जुन घुले यांनीही पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात रविंद्र कालेकर यांनी पालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.
यावेळी शैक्षणिक वर्षासाठी पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. इयत्ता आठवीमधून नितेश केशव तांबे आणि सीमा लंकेश पाते, इयत्ता नववीमधून सुहास सोनू रेवाळे आणि नेहा विकास जाधव, तर इयत्ता दहावीमधून सुरेश अनंत कासेकर आणि संजना संतोष झाटे यांची पालक प्रतिनिधी म्हणून निवड झाली.
कार्यक्रमाला माधव चितळे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन राणे यांनी केले, प्रास्ताविक भागशाळा प्रमुख डी.आर. जाधव यांनी केले, तर आभार एस.आय. मगदूम यांनी मानले.