CSMT स्टेशनवरील चहावाल्याचा मोठा तिकीट घोटाळा उघड, महिन्याला दीड ते दोन लाखांची कमाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील एका चहावाल्याने रेल्वेच्या कन्फर्म तिकीट घोटाळ्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविंद्र कुमार साहू असे या चहावाल्याचे नाव असून, त्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्यातून तिकिटे कन्फर्म करून दिली. या घोटाळ्यातून त्याने महिन्याला तब्बल दीड ते दोन लाख रुपये कमावले. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

सीएसएमटी येथे चहावाल्याचे दुकान असलेल्या साहूने रेल्वे कँटिनमध्ये काम करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. तो वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता यांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा. याच ओळखीचा फायदा घेत त्याने या अधिकाऱ्यांच्या बनावट सही आणि शिक्के तयार केले. वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी तो बनावट पत्र तयार करायचा आणि त्यावर अधिकाऱ्यांच्या खोट्या सही-शिक्क्यांचा वापर करून तिकिटे कन्फर्म करून घ्यायचा. यासाठी त्याने प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारले.

रेल्वेच्या तिकीटांसाठी प्रवाशांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागजास्त पैसे देऊन एजंटकडून तिकिटे घ्यावी लागतात. या परिस्थितीचा फायदा घेत साहूने हा घोटाळा रचला. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने तिकीट तपासणी दरम्यान काही प्रवाशांनी जास्त पैसे देऊन कन्फर्म तिकिटे घेतल्याचे उघड केले. यानंतर अधिक चौकशी केली असता हा घोटाळा समोर आला. साहूच्या या कारनाम्याने रेल्वे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने साहूविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याच्यावर रेल्वेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षता विभागाचे मुख्य निरीक्षक आणि त्यांचे पथक या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*