दिनांक १४ मे २०२१ रोजी लक्षद्वीप आणि सभोवतालील अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे दिनांक १५ मे २०२१ पहाटे चक्रीवादळात रुपांतर होणार असून ते अधिक तीव्र होवून उत्तर-वायव्येकडे गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे सरकरणार असून ते दिनांक १८ मे २०२१ च्या सकाळी गुजरात किनारपट्टी जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
“ताऊक-ती” चक्रीवादळाचा प्रवास हा समुद्रमार्गे असून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोंकण विभागामध्ये दिनांक १५ ते १६ मे २०२१ दरम्यान ६० ते ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून सदर कालावधीत दक्षिण कोकणात (सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी) बहुतांश तिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तसेच उत्तर कोकणात (रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारत मौसम विभागाने वर्तवली आहे.
नागरिकांसाठी सूचना :
• चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिनांक १६ मे
२०२१ रोजी जोराच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःच्या कुटुंबाची तसेच जनावरांची सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी.
• सुरक्षित ठिकाणी थांबावे.
• घराच्या सभोवतालचे क्षेत्र तपासून घराला धोका संभवत असलेली झाडे किंवा फांद्या काढून टाकाव्यात तसेच पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त साठा करून ठेवावा.
• बॅटरी, मोबाईल चार्ज करून ठेवावेत.
• कच्चे घर, विद्युत खांब, आणि झाडाच्या खाली थांबू नये.
कृषि आणि पशुधनविषयक सल्ला:
• पक्व भाजीपाला पिकांची आणि तयार आंबा, चिकू, कोकम फळांची तसेच केळीच्या घडांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेली पिके शेतामध्ये उघड्यावर ठेवू नये.
• नवीन लागवड केलेल्या फळझाडांना, केळी पिकांना तसेच भाजीपाला, फूल पिकांना काठीचा आधार द्यावा.
• झाडांच्या वाळलेल्या रोगट फांद्या कापून काढाव्यात.
• सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊसाची शक्यता लक्षात घेता सर्व कीटकनाशके फवारणी आणि खतांची मात्रा देणे पुढे ढकलावी.
• भाजीपाला, हळद आणि इतर पिकांच्या पेरणीची कामे पुढे ढकलावी.
• पेरणी/ लागवड केलेल्या पिकक्षेत्रातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
• नारळ,सुपारी, आंबा,काजू, चिकू, केळी आणि इतर फळबागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
• जनावरांच्या गोठ्याची डागडुगी करून घ्यावी. वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेवून जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. जनावरांचे खाद्य जसे भाताचा पेंडा, काड इत्यादी सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी तसेच पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त साठा करून ठेवावा.
• गाई, म्हैशी इ. जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत. जनावरांना बाहेर चरावयास सोडू नये.
• कुकुटपालन शेडच्या सभोवताल बारदान किंवा गोणपाट बांधावे.
• मच्छीमार बांधवानी दिनांक १८ मे २०२१ पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये.
सौजन्य:-
ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना
कृषि विद्या विभाग
डॉ. बा.सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली