रत्नागिरी : स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासाला ठेवीदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ३० जून रोजी एकाच दिवसात संस्थेने २ कोटी ७ लाख रुपयांच्या नवीन ठेवी संकलित केल्या, ही या ठेव वृद्धी मासातील सर्वात मोठी एकदिवसीय कामगिरी ठरली आहे. संस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये ठेवीदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या ठेव वृद्धी मासात पहिल्यांदाच एका दिवसात २ कोटी ४ लाख रुपये संकलित झाले असून, ६५ ठेवीदार सभासदांनी आपल्या ठेवी संस्थेत गुंतवल्या. ही कामगिरी संपूर्ण यंत्रणेसाठी प्रेरणादायी ठरली आहे, असे संस्थेचे ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
पहिल्या १० दिवसांत स्वरूपानंद पतसंस्थेने ७ कोटी ९६ लाख रुपयांच्या नवीन ठेवी संकलित केल्या असून, संस्थेच्या एकूण ठेवी आता ३५९ कोटी रुपये झाल्या आहेत. पतसंस्थांना त्यांच्या स्वनिधीच्या १० पट ठेवी उभारण्याची मुभा आहे. स्वरूपानंद पतसंस्थेचा स्वनिधी ४८ कोटी रुपये असून, त्यानुसार ४८० कोटी रुपयांपर्यंत ठेवी उभारणे शक्य आहे. मात्र, कर्ज मागणीचा अंदाज घेऊन ठेवी उभारणे महत्त्वाचे आहे. सध्या संस्थेचा C.D. रेशो (कर्ज-ठेव प्रमाण) ६३% असून, ३७० कोटी रुपयांपर्यंत ठेवी उभारणे किफायती ठरेल.
संस्थेच्या गुंतवणुका १४८ कोटी ६८ लाख रुपये असून, SLR आणि अन्य निधींची १००% गुंतवणूक पूर्ण झाली आहे. स्वरूपानंद पतसंस्थेची जनमानसातील विश्वासार्ह प्रतिमा ठेवींच्या वाढत्या ओघातून अधोरेखित होत आहे, असे ॲड. दीपक पटवर्धन यांनी नमूद केले. ठेव वृद्धी मासाच्या उर्वरित कालावधीत ठेवीदारांनी संस्थेच्या आकर्षक आणि सुरक्षित योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.