देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या (१३ एप्रिल) ते पदभार स्वीकरणार आहेत. सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरपासूनच निश्चित मानले जात होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. या अगोदर सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. आता सुशील चंद्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सुशील चंद्र यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमधील निवडणूका पार पाडणार आहे.