शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार!

दापोली : दापोली मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज असल्याचे चित्र सध्या मतदारसंघामध्ये जोरदारपणे रंगलं आहे.

कुणी म्हणत आहे की, ते भाजपामध्ये जाणार आहेत तर कोणी म्हणत आहे की, ते सध्याच्या पक्षामध्ये आपलं महत्त्व वाढवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या कोणताही निर्णय घेताना सूर्यकांत दळवी यांना विश्वासात घेतलं जात नाहीये.

त्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत अशी माहिती, त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये खरंच जाणार का? हा प्रश्न नाक्या नाक्यावर चर्चिला जात आहे.

सूर्यकांत दळवी हे आपण पक्ष बदलणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही असं देत आहेत. त्यांच्या मनात काय आहे? हे ते उघडपणे बोलत नाहीये.

पण कार्यकर्त्यांशी मात्र ते सल्लामसलत करत आहेत मी जर पक्ष सोडून गेलो तर तुम्ही माझ्यासोबत येणार का?

आपल्या जवळच्या मंडळींना फोन करून ते भाजपामध्ये येण्याबाबत विचारणा करत आहेत. त्याबरोबरच भाजपमध्ये जाणं हे योग्य राहील का? याबद्दलही ते जवळच्या कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत आहेत.

सध्या माय कोकणच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकांत दळवी हे किशोर देसाई, विश्वास काका कदम आणि शांताराम पवार यांना सोबत येण्यासाठी आग्रह धरत आहेत.

परंतु यापैकी काही जण तयार होत नाहीयेत अशी माहिती सुद्धा माय कोकणच्या सूत्राने दिली आहे. त्यांची मनधरणी करण्याचं काम सध्या दळवींच्या समर्थकांकडून सुरू आहे.

ही दुसरी वेळ आहे जेव्हा सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा उठली आहे. ज्या वेगाने ही चर्चा संपूर्ण दापोलीत मतदारसंघांमध्ये पसरली आहे.

त्या वेगाने किंवा त्या प्रखरपणे सूर्यकांत दळवी या चर्चेचं खंडन करताना दिसत नाहीयेत. अर्थात मी भाजपमध्ये जाणार नाहीये असं न म्हणता ते भाजपमध्ये जाणार असल्याचं अद्यापही ठरलं नाहीये, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना देत आहेत.

ते स्पष्टपणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला नाकारत नाहीयेत. याचा अर्थ ते भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा ते आपल्या पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपूर्ण दापोली तालुक्याबरोबरच खेड आणि मंडणगड मध्ये देखील सूर्यकांत दळवी लवकरच पक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपचे कार्यकर्ते सूर्यकांत दळवी हे लवकरच प्रवेश करणार असल्याच्या बातमीला एक प्रकारे दुजोराच देत आहेत.

गेल्या आठवड्यात अक्षय फाटक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

त्याचवेळी सूर्यकांत दळवी हे देखील आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदारपणे होती. परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.

सूर्यकांत दळवी आणि त्यांचे कार्यकर्ते काही त्या ठिकाणी आले नाहीत. मग चर्चा सुरू झाली की त्यांचा प्रवेश हा नंतर होणार आहे. अर्थात ही माहिती गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने समोर येते आहे.

सगळ्यात जास्त जर ही बातमी कुठून मार्केटमध्ये फ्लोट झाली असेल तर ती भाजपाच्या गोटातून झाली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी ‘माय कोकण’ला दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे की, अक्षय फाटक यांचा भाजपा प्रवेश हा पहिला टप्पा आहे.

या पुढे देखील भाजपमध्ये आणखी महत्त्वाचे प्रवेश होणार आहेत. सूर्यकांत दळवी यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चे दरम्यान केदार साठे यांचा हा इशारा खूप काही सांगून जात आहे.

सूर्यकांत दळवी हे मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये जाणार आहेत, अशा बातम्या सुद्धा पुढे येत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांची भेट ही झाली होती. कुठल्याही क्षणाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशी माहिती देखील पुढे येत होती. पण सूर्यकांत दळवी हे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील गेले नाहीत. पक्ष बदलण्याच्या त्यांच्याबद्दलच्या बातम्या ह्या मध्ये मध्ये येत राहतात. पण आतापर्यंतचा अनुभव सगळ्यांचा अनुभव राहिला आहे की, त्यांनी कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचंग टाळला आहे.

सूर्यकांत दळवी हे शिवसेनेमध्ये 1986 सालापासून कार्यरत आहेत. हा कालावधी खूप मोठा आहे. यादरम्यान ते पाच वेळेला आमदार म्हणून निवडून आले होते.

डबल हॅट्रिक मारणार असं वाटत असताना त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. त्यानंतर पक्षामध्ये त्यांचं महत्त्व हळूहळू कमी होत गेलं.

वरिष्ठ नेतृत्व त्यांना विश्वासात घेत नव्हते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या त्यांच्या भेटीगाठी वाढत होत्या.

एकदा सूर्यकांत दळवी हे नाणीज मध्ये खास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले होते.

तेव्हा शिवसेना अखंड होती तेव्हाही या चर्चा होत्या की, लवकरच ते भाजपमध्ये जाणार आहेत. पण ते काही भाजपमध्ये गेले नाहीत.

त्यानंतर दापोली मधलं राजकारण बदललं. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री झाले आणि सूर्यकांत दळवी यांना महत्त्व प्राप्त झालं. त्यानंतर पुन्हा एकदा सूर्यकांत दळवी हे शिवसेनेमध्ये सक्रिय झाले होते.

पण थोड्याच दिवसांनी राज्यातील राजकारण 360 डिग्रीनं बदललं. शिवसेनेचे दोन भाग झाले. दापोलीचे माजी संजय कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आले आणि सूर्यकांत दळवी हे त्यांच्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसू लागले.

अलीकडच्या काळात मात्र पक्ष निर्णय प्रक्रियेत सामावून घेत नसल्याची धारणा त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची झाली आहे.

त्याबद्दलची त्यांची नाराजी उघड आहे. या सगळ्या गोष्टींमुळेच ते पक्ष सोडणार या चर्चा जोरकसपणे होऊ लागल्या आहेत.

सूर्यकांत दळवी यांच्यासह मुंबईतून देखील काही कार्यकर्ते सक्रियपणे त्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

सूर्यकांत दळवी यांनी आपल्या समर्थकांजवळ चर्चा केली असून हे समर्थक तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्यासोबत येण्यासाठी आग्रह करीत आहेत, तर काही कार्यकर्ते हे त्याच्यासमवेत जाण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार संजय कदम व दापोली आणि मंडणगड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक खेड येथे पार पडली.

या बैठकीत तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत ठाम राहाण्याबाबत सांगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सूर्यकांत दळवी यांचा गेल्या चार दशकांचा दापोलीतला वावर आहे. दापोली मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. सूर्यकांत दळवी यांची ताकद आज कमी झाली असली तरी त्यांचं पक्षातील राजकीय महत्त्व नाकारून चालणार नाही. भाजपाला ही गोष्ट उमगली आहे. त्यामुळे सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी वारंवार भाजपाचे नेते गळ घालत आहेत.

याच सगळ्या पार्श्वभूमीवर सूर्यकांत दळवी यांच्या पक्ष बदलाबाबत सध्या चर्चा जोरात आहे. मागच्या वेळेला पण ती होती. यंदा ते खरंच भाजपामध्ये जाणार का? की पक्ष त्यांची नाराजी दूर करेल, हे लवकरच स्पष्ट होईल.