मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना आज सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 11 महिन्यानंतर त्यांची जामिन मिळाला आहे. त्यांच्या समर्थकांनी खेड शहरात यावेळी जल्लोष केला.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2024/02/img_20240212_1215545522826198155137505.jpg)
सदानंद कदम यांना 10 मार्च 2023 रोजी चार तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरूड येथील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाली होती.
ईडीच्या अधिकारी 10 मार्च 2023 रोजी सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊसवर म्हणजेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन ते पथक मुंबईच्या दिशेने गेले होते आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
11 महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर सदानंद कदम यांना जामीन मिळाला आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल 1 डिसेंबर रोजी राखून ठेवला होता. तो नंतर जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला होता.
उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद कदम यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती अखेर आज सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.
पेढा भरवत आनंद साजरा
दरम्यान खेड शहरामध्ये सदानंद कदम यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. माजी आमदार संजय कदम आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी एकमेकांना पेढा भरवून आपला आनंद साजरा केला.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2024/02/img_20240212_1212326510113828592740615.jpg)