मुंबई- महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लशींचा पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी टोपे यांनी विविध मुद्दे मांडताना महाराष्ट्रात करोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लसीकरणाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर टोपे यांनी भर दिला. या वेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. राज्यात २५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. आढावा बैठकीत टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्यात सध्या रुग्णसंख्या आढळतेय त्यात २५ ते ४० वयोगटातील संख्या अधिक आहे आणि या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन २५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीत करण्याची मागणी टोपे यांनी केली. यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज ४ लाखांहून अधिक जणांना लसीकरण केले जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी लसीकरण जास्त उपायकारक असून राज्याने त्याला गती दिली आहे. राज्यातील लसी वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. राज्यात सध्याचा लशींचा साठा लक्षात केंद्र शासनाकडून तातडीने मागणी प्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. कोव्हॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा, असे टोपे यांनी सांगितले.