
चिपळूण: चिपळूण नगर परिषदेच्या वतीने सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित ‘प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धा २०२५’चा बक्षीस वितरण सोहळा आणि ‘होम मिनिस्टर’ खेळ सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार शेखर निकम आणि अभिनेते ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला.
या स्पर्धेत लकी ड्रॉमधून वसुंधरा पाटील यांना मानाची पैठणी मिळाली, तर सर्वाधिक ३८.५ किलो प्लास्टिक जमा करून १५४ कूपन्स मिळवणाऱ्या स्वप्नाली सुनील निवाते दुसऱ्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. अटीतटीच्या होम मिनिस्टर खेळात सुदैवी ठसाळे यांनी सोन्याची नथ जिंकली. या उपक्रमात ३०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि एकूण १७४१ किलो प्लास्टिक जमा झाले. प्रत्येक १ किलो प्लास्टिकसाठी ४ कूपन्स देण्यात आले होते. १५ पेक्षा जास्त कूपन्स मिळवणाऱ्या १९२ महिलांमध्ये ‘होम मिनिस्टर’ खेळ घेण्यात आला.
रत्नागिरीचे लोककलावंत सुनील बेंडखळे यांनी खेळात रंगत आणली. १०० पेक्षा जास्त कूपन्स मिळवणाऱ्या आसिफ तुरुक, जयश्री आंबेकर, कविता मिर्लेकर, तेजस्विनी किंजलकर, रूपाली आवले आणि साक्षी लोटेकर यांना जिव्हाळा मार्ट, काविळतळी यांच्याकडून अपसायकल शॉपिंग बॅग प्रदान करण्यात आल्या. १५ कूपन्सपेक्षा कमी मिळवणाऱ्या १०९ महिलांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढण्यात आला, ज्यात सानिका पडवेकर, अश्विनी भुस्कुटे आणि फैमीदा शेख यांना अपसायकल शॉपिंग बॅग मिळाल्या. सर्व सहभागी महिलांना जिव्हाळा मार्टवर ५ टक्के खरेदी सूट जाहीर झाली.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, अभिनेते ओंकार भोजने, मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, माजी सभापती पूजा निकम, सुमित लोंढे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर आदी उपस्थित होते.
भाऊ काटदरे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश आणि प्लास्टिक रिसायकलिंगची माहिती दिली. ही स्पर्धा मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. आमदार शेखर निकम यांनी “प्लास्टिकमुक्त जीवनशैली अंगिकारू या,” असे आवाहन केले. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले की, नागरिक आणि नगर परिषदेच्या सहकार्यामुळे चिपळूणने स्वच्छता अभियानात राज्यात १४ वा आणि कोकणात प्रथम क्रमांक मिळवला.
मुख्याधिकारी भोसले यांना ‘महाराष्ट्र फर्स्ट २०२५’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले. यावेळी नाटक कंपनी चिपळूणने चित्रांगण मुंबईच्या सहकार्याने तयार केलेली ‘राखणदार’ ही पर्यावरण जनजागृती शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली. ओंकार भोजने यांनी वृक्षतोड आणि प्लास्टिकच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली.
सह्याद्री निसर्ग मित्रच्या संजय तांबट, संदेश जाधव, दिनेश धुमक, विनोद थिटे, कविता पाटील, रुचिता मोहिते, साक्षी बेंडकर, मैथिली कदम, रोहिणी पांचाळ, अपर्णा कदम यांचा सन्मान झाला. जिव्हाळा मार्टचे संतोष पेढांबकर आणि जयंत साडी सेंटरचे जैन यांचाही विशेष सन्मान झाला. सोन्याची नथ जयंत साडी सेंटरने प्रायोजित केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले, तर आभार सुजित जाधव यांनी मानले.

Leave a Reply