गणपतीपुळे :- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात चार जण बुडत होते ; मात्र समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या जेसकी बोटचालकांनी या चौघांना वाचवले आहे. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश सुतार (35), शमाली सूर्यवंशी (38), मृदुला सूर्यवंशी | व मंदी सूर्यवंशी (14) अशी वाचवण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. हे सर्वजण सातारा नांदवडे तालुका कोरेगाव येथील रहिवासी आहेत.
हे चौघेजण अति उत्साहात समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचवेळी ते गटांगळ्या खाऊ लागले. हात उंचावून वाचवण्यासाठी मदत मागत होते. याचवेळी समुद्राकिनाऱ्यावर असलेल्या जेसकी बोट चालकांच्या लक्षात आले. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता जेसकी बोट चालकांनी आपली बोट खोल समुद्रात नेऊन आपली धाडसी कामगिरी करत त्या चार जणांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.