रत्नागिरी : कोकणातील सूक्ष्म सिंचन संच बसविणार्या शेतकर्यांना पूरक अनुदान देण्याकरिता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश 6 जानेवारी रोजी जारी करण्यात आला आहे. कोकणातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतकर्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना खर्च मर्यादेच्या 55 टक्के व इतर शेतकर्यांना खर्च मर्यादेच्या 45 टक्के अनुदान 5 हेक्टर कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते. योजनेकरिता केंद्र शासन 60 टक्के व राज्य शासन 40 टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करून देते. 18 नोव्हेंबर 2021 रोजी कोकणातील सर्व तालुक्यातील शेतकर्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविणार्या शेतकर्यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना मिळणार्या 55 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर शेतकर्यांना मिळणार्या 45 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.