दापोली : कोळी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पाजपंढरी परिसरातील विद्यार्थ्यांनी दापोली एसटी आगारात येऊन प्रशासनाला जाब विचारला.

अखेर वाहकांने संतप्त भावनांचा आदर करत माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

दापोली आगारातून ४ नोव्हेंबर रोजी दु. २.३० वा. दापोली-पाजपंढरी ही बस रवाना झाली. पाजपंढरी मराठी शाळा येथे ही बस आली असताना एका दुचाकी स्वाराजवळ किरकोळ कारणावरून वाद झाला. याच दरम्यान गाडीमध्ये वाहकाने कोळी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले.

त्यामुळे बसमध्ये असलेले विद्यार्थी संतापले होते. त्यांनी वाहकाला तिथल्या तिथे सुनावले. मात्र वाहकाने तेथे माफी मागितली नाही.

त्यामुळे सोमवारी पाजपंढरी परिसरातील विविध महाविद्यालयामध्ये जाणारे सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी दापोली आगारासमोर जमले व त्यांनी सदर वाहकावर कारवाई करावी व त्याने जाहीरपणे समाजाची माफी मागावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी दापोली आगार व्यवस्थापकांकडे केली.

विद्यार्थ्यांची संतप्त भावना लक्षात घेऊन सदर बसवर कोणता वाहक कार्यरत होता याचा शोध तातडीने घेण्यात आला.

दुपारी ३ वा. सदर वाहक, आगार व्यवस्थापन व विद्यार्थी यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी वाहकाने आपण चुकीचे वक्तव्य केले असल्याचे सांगत समाजाची माफी मागितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.