रत्नागिरी : येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियमावली केली आहे त्यानुसार सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत जनतेला आवाहन केले आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे वादळ रत्नागिरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांच्या सर्व बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत, खलाशांची टेस्ट देखील करण्यात आली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे, पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यानी दोन बैठका या संदर्भात घेतल्या आहेत. प्रत्येकाने काळजी घ्या, कोव्हिड सेंटर च्या ठिकाणी जनरेटर सुविधा करण्यात आल्या आहेत, ज्या क्षणाला प्रशासनाला आपली गरज लागेल तेथे मदत करावी, कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे.
अत्यावश्यक परिस्थितीत स्थलांतर करण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. प्रत्येकाने काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. एन.डी.आर. एफ. शी देखील जिल्हाधिकारी यांनी संपर्क साधला आहे. आपल्याकडे किनारपट्टी भागात याचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता आहे.
मागील अनुभव विचारात घेता लाकूड कापण्याचे कटर, जेसीबी तयार ठेवण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा तसेच रत्नागिरी शहरातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती ना उदय सामंत यांनी दिली आहे.