कोकणावर घोंघावतंय पुन्हा वादळ? कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरीः आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काहीवर्षे कोकण किनारपट्टीवरील वातावरणात कमालीचा बदल होऊ लागला आहे. या अस्थिर झालेल्या हवामान बदलाचा परिणाम जाणवू लागला आहे. सुरक्षित व शांत असलेल्या कोकण किनारपट्टीवर आता जवळपास दरवर्षी वादळे येऊ लागली आहेत. हवामान विभागाकडून अत्ताही चक्क मार्च महिन्यात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

२१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा मच्छिमारांना इतर राज्यांच्या जवळपासच्या भागात निवारा आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता भासू शकते. याकरीता वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना सर्व मच्छीमारांना पोहोचवणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडुन सर्व मच्छीमार बांधवांना हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. फयान, निसर्ग, तौक्ते या चक्रीवादळामुळे कोकणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, बागायदार निसर्ग वादळात तब्बल २५ वर्षे मागे गेला आहे. मच्छीमारांचही निसर्ग वादळात प्रचंड नुकसान झाले होते आता पुन्हा वादळाचा धोक्याचा इशारा असल्याने निसर्गदेवतेने कोकणवासीयांची आता पुन्हा परीक्षा पाहू नये अशी प्रार्थना कोकणवासीय करतात.

दरम्यान, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार आग्नेय बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात गुरुवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. पुढील तीन दिवसांत या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. समुद्रावरून उत्तरेकडे सरकताना या क्षेत्राचा प्रवास अंदमान निकोबार बेटांच्या जवळून होणार असल्यामुळे या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसू शकतो. २१ तारखेला हंगामातील पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, २२ मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टी जवळ पोचेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*