दापोली/प्रतिनिधी

खेड – दापोली मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसवर अज्ञात व्यक्तीननं दगडफेक करून 8 हजार रूपयांचं नुकसान केलं आहे. दगडफेक करून ही व्यक्ती फरार झाली आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

50 वर्षीय दयानंद सहदेव धोत्रे आपल्या ताब्यातील एस. टी. बस क्रमांक एम. एच. 14/बीटी/2496 घेऊन खेडहून दापोलीकडे जात होते. दापोली शहरातील नवानगर येथे आल्यावर चालत्या बसवर डाव्या बाजूनं अंधारातून दगड भिरकावण्यात आला.

या दगडफेकीत बसच्या डाव्या बाजूची काच फुटली आहे. यामध्ये सार्वजनिक संपत्तीचं अंदाजे 8000/- रुपयांचं नुकसान झालं आहे. दयानंद धोत्रे यांनी याबद्दलची फिर्याद दापोली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

(See Video)

दापोली पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात भा. दं. वि. क. ४२७ व  सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिंबध अधिनियम १९८४चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या वेतन वाढीनंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामाला सुरुवात केली आहे. मात्र काही जण अद्यापही संपावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीतून ही दगडफेक झाली नसावी ना, अशी चर्चाही सध्या सुरू आहे.