कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसने केले. काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाउनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.
यावर महाराष्ट्रावर केलेले आरोप हा महाराष्ट्र सरकारवरील ठपका आहे, त्यामुळे राज्य सरकारने खुलासा करणे योग्य ठरणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. सरकारच्या प्रत्येक मुद्यावर मी बोलण्याचा ठेका घेतला नसल्याचेही राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याचे वाईट वाटलं. कोरोनाच्या प्रसाराचे खापर महाराष्ट्रावर फोडण चुकीचे आहे. आता या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने खुलासा करणे योग्य ठरेल असेही राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी म्हटले की, कोरोना नियंत्रणाबाबत जगभरात महाराष्ट्राचे कौतुक झाले आहे. धारावी पँटर्नचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले. कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. हा त्यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी म्हटले.