मुंबई : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी मासिक किंवा त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळं प्रवास करणं शक्य झालं नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक किंवा त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्याचबोबर ज्यांना या मासिक किंवा त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे. याबद्दलची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट अनिल परब यांनी दिली आहे. तशा आशयाचे परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

२२ मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याकाळात अनेकांनी मासिक/त्रैमासिक पास काढले होते. परंतु एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणं शक्य झालं नाही .अशा प्रवाशांच्या मासिक/ त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील ती सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे.

त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.