पुण्यातल्या मेळाव्यात एकजुटीचा निर्धार
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्व समाजवाद्यांनी आपले पक्ष व राहुट्या वेगळ्या असल्या तरी भाजपाला हटवण्यासाठी ‘इंडिया’ सोबत एकजुटीने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजवादी जनता परिवारातील विविध पक्ष आणि संघटनांमधील ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद बैठक नुकतीच (24 ऑगस्ट) पुण्यात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे पार पडली.
जनता दल (यूनाइटेडचे) राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या प्रयत्नाने झालेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीचे महाराष्ट्रातील समाजवाद्यांनी स्वागत केले आहे. नीतीशकुमार आणि राहुल गांधी यांचे बैठकीतील अनेक नेत्यांनी अभिनंदन केले.
समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा, डॉ. अभिजीत वैद्य, जनता दल (सेक्युलर) चे नेते गंगाधर पटने, श्रीमती शान ए हिंद निहाल अहमद, अजमल खान, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, जद(यू) प्रदेश अध्यक्ष शशांक राव, कार्याध्यक्ष अतुल देशमुख, सच्चिदानंद शेट्टी, मलविंदरसिंह खुराणा, आदिवासी नेते काळूराम काका धोदडे, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, सुभाष वारे, ज्येष्ठ कामगार नेते असीम रॉय, सुभाष लोमटे, सोमनाथ रोडे, अजित शिंदे, मनीषा पाटील, लोकशाहीर संभाजी भगत, लोककवी अरुण म्हात्रे, मानव अधिकार कार्यकर्ते जतीन देसाई, प्रभाकर नारकर, शरद जावडेकर, हसन देसाई, आरजेडीचे प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे, मिलिंद टिपणीस, मोहन वाडेकर यांच्यासह समाजवादी जनता परिवारातील पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दल (सेक्युलर) चे प्रदेश अध्यक्ष शरद पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या बैठकीला आपले समर्थन कळवले होते.
राज्यातील ‘वंचित बहुजन’, शेतकरी आणि कष्टकरी या तिन्ही शक्तींना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात परिवर्तन घडणार नाही, याची दखल महाविकास आघाडीने घ्यावी, अशी जाणीव या बैठकीतील राजकीय ठरावात करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ओबीसींसह जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे निर्माण झालेले पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या विशेषत: कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, महामानवांची होणारी बदनामी, अल्पसंख्यांक समुदायांवर होणारे हल्ले, कष्टकऱ्यांना देशोधडीला लावणारे माथाडी बिल, वाढती बेरोजगारी आणि नोकर भरतीचे कंत्राटीकरण याबद्दल समाजवादी बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
समाजवादी विचारधारेतील सर्व गटांनी पुन्हा एक परिवार म्हणून का उभं राहू नये ? भूतकाळातील चुका, दुरावा, मतभेद, मनभेद सारं काही विसरून एकत्र यायला काय हरकत आहे ? आपल्या सर्वांचं मूळ घर एकच तर होतं, या भूमिकेतून राज्यातील सर्व समाजवादी एक झाले होते.
संवाद बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद होता. गर्दी इतकी ओसंडून वाहत होती की बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले. अशा पद्धतीचे मेळावे लवकरच नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण आणि मुंबईत होणार आहेत, अशी माहिती जनता दल (यूनाइटेड) राज्य सचिव विनय खेडेकर यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क – राजा कांदळकर 9987121300