
दापोली/संगमेश्वर : सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या सेवाव्रती वृत्तीची समाजात जाणीव निर्माण होऊन ती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने २०१०-११ पासून सुरू असलेला “सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार” यंदा उत्कृष्ट शिक्षक व प्रगतीशील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवभारत छात्रालय सभागृह, दापोली येथे संपन्न होणार आहे.
निवड समितीच्या शिफारशीवरून सन २०२५-२६ साठी ‘उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक (ग्रामीण)’ पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कर्दे (ता. दापोली) येथील शिक्षक स्वप्नील बाळासाहेब परकाळे व जिल्हा परिषद आदर्श शाळा, आंबवली (ता. खेड) येथील शिक्षिका सौ. रसिका रमेश रेवाळे यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. ‘उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (ग्रामीण)’ पुरस्कार एन. के. वराडकर हायस्कूल, मुरूड (ता. दापोली) येथील शिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना तर ‘उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (शहरी)’ पुरस्कार मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथील इम्तियाज इमामुद्दिन सिद्दीकी यांना प्रदान होणार आहे.
याशिवाय ‘उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी’ पुरस्कार संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावचे विलास शांताराम शेलार व लांजा तालुक्यातील आगवे येथील महिला शेतकरी श्रीमती मिताली मिलिंद जोशी यांना देण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण, शेती, सामाजिक व कृषी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व ५,००० रुपये रोख असे आहे. यंदा पुरस्कारांसाठी वृत्तपत्रे, पत्रव्यवहार तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून माहिती गोळा करण्यात आली होती.
निवड समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत होते, तर प्रा. प्रभाकर शिंदे, डॉ. राजन खांडेकर, प्रभाकर तेरेकर, सुनिल गुरव, रमाकांत शिगवण, डॉ. अशोककुमार निर्वाण सदस्य व हरिश्चंद्र कोकमकर समन्वयक म्हणून कार्यरत होते. समितीने उमेदवारांच्या कार्यस्थळी प्रत्यक्ष भेटी घेऊन पाहणी केली.
हा सोहळा कै. द. सि. सामंत गुरुजी व कै. पांडुरंग गणपत शिंदे गुरुजी यांच्या स्मृति मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते असतील, तर विशेष अतिथी म्हणून मा. ह. भ. प. ज्ञानेश्वर संजय बंडगर (संतसाहित्य अभ्यासक, वारकरी कीर्तनकार, घेरडी, जि. सोलापूर) उपस्थित राहतील.

Leave a Reply