तीन महिन्यातील तिसरी घटना; भरणे पुलावरील उतार धोकादायक

खेड (भरत निकम) : महामार्गावरील भरणे जगबुडी नदी पुलावर कंटेनर उलटून अपघात झाला आहे. तीन महिन्यातील ही तिसरी घटना असून यामुळे जगबुडी पुलाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या तीन महिन्यात तीन घटना घडल्या असून या अपघातांमुळे जगबुडी नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गवर चार पदरी रस्ता झाल्यावर अपघात होणार नाही, ब्लाइंड स्पॉटची संख्या कमी होईल असं वाटत असताना जगबुडी पुलावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

ज्या भागांमध्ये अपघात होण्याची अतिशय कमी शक्यता होती. अशा ठिकाणी महिन्याभरामध्ये तीन-तीन अपघात घडले आहेत. त्यामुळे संबंधित महामार्ग विभागाने या घटनांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आणि ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील भरणेनाका उड्डाण पुलाकडून जगबुडी नदी पुलाकडे उतरणाऱ्या वळणामुळे जगबुडी नदी पुलावर सातत्याने मोठमोठे कंटेनर उलटून अपघात घडत आहेत.

या ठिकाणी दुर्दैवाने लक्सरी बसचा अपघात झाला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.