रत्नागिरी : मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाची ६१,१९,०८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीने फिर्यादी यांना सिम कार्ड बंद होण्याची भीती घालून आणि मनी लाँड्रींगचा आरोप लावून फसवणूक केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपी राजीव विश्वनाथ तिवारी (वय ४७, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश, सध्या स्वरूप विहार, दिल्ली) याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करून ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.

फिर्यादी यांना मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगून सिम कार्ड बंद होण्याची भीती दाखवण्यात आली. तसेच, दुसऱ्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या कॅनरा बँक खात्यातून २ कोटींचा मनी लाँड्रींगचा व्यवहार झाल्याचा बनाव केला. यानंतर फिर्यादी यांना खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून त्यांची ६१,१९,०८० रुपयांची फसवणूक करण्यात आली. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी बँकांकडून मिळालेल्या माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधला. मोबाइल लोकेशन उपलब्ध नसताना स्थानिक बातमीदार तयार करून दिल्ली येथे तपास पथक पाठवण्यात आले. पथकाने आरोपी राजीव तिवारी याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोहवा रामचंद्र वडार, पोकॉ रोहन कदम, पोकॉ रामदास पिसे, पोहवा संदीप नाईक आणि पोहवा रमिज शेख यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

पोलिसांचा सल्ला: कोणीही मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, नॅशनल सिक्युरिटी किंवा इतर कोणत्याही विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमचे सिम कार्ड बंद होईल किंवा तुमच्या खात्याचा गैरवापर झाल्याचा दावा करत वैयक्तिक किंवा बँक माहिती मागत असेल, तर अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नका. तुमची वैयक्तिक किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका आणि अशा धमक्यांना बळी पडू नका.