जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई- जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज बुधवारी निधन झाले. मुंबईतील कोकीलाबेन अंबानी रूग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रमेश देव यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या भुमिका अजरामर राहिल्या होत्या. त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून मुलगा अजिंक्य देव अभिनेता तर दुसरा मुलगा अभिनव हा दिगदर्शक आहे. आनंद सारख्या प्रसिद्ध चित्रपटासह शेकडो चित्रपट रमेश देव यांनी केले आहे.

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी झाला. रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये २०० हून अधिक शो केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

१९५१ मध्ये त्यांनी मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतोय एक डोळा या मराठी चित्रपटाद्वारे रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांची सुरुवात खलनायक म्हणून झाली. राजश्री प्रॉडक्शनचा आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन (आनंद), राजेश खन्ना (आप की कसम) सारख्या तारकांना समर्थ साथ दिली. चारच दिवसांपूर्वी त्यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*