चंद्रनगर जि. प. शाळेत झाला बक्षीस वितरण कार्यक्रम

दापोली – दापोली येथील ‘क्षितिज कला मंच’ ने तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रानबिया संकलन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत पार पडला.

या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रमोद सावंत, जालगावचे सरपंच तथा बांधकाम व्यावसायिक अक्षय फाटक, उद्योजक अमोल मुंगशे, जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन मुळे, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, दापोलीतील प्रथितयश कवी व गझलकार सुदेश मालवणकर, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करून व पर्यावरण संतुलनाचे भान ठेवून जंगली वृक्षांच्या हजारो रानबिया संकलीत केल्या.

चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांकडून अऔइशय भरघोस प्रतिसाद लाभल्याने हा बक्षीस वितरण समारंभ चंद्रनगर शाळेत आयोजित करण्यात आला होता.

या अभिनव स्पर्धेत सर्वाधिक रानबिया गोळा करून व त्यांची गटवार विगतवारी करून लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल चंद्रनगर शाळेतील आरोही महेश मुलूख हिचा प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. श्रेयश अनिल शिगवण याने द्वितिय तर स्वरा श्रीकांत कोळंबे हिने तृतिय क्रमांक पटकावला.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू व ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी अक्षय फाटक, प्रमोद सावंत, सुदेश मालवणकर, मोहन मुळे आदींनी आपले पर्यावरणविषयक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर यांनी केले तर क्षितिज कला मंचच्या सुनील कदम यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षितिज कला मंचच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.