स्टॉक मार्केट रेगुलेटर सेबीने (Securities and Exchange Board of India, SEBI) शुक्रवारी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (Reliance Home Finance Limited), उद्योगपती अनिल अंबानींसह (Anil Ambani) तिघांवर मोठी कारवाई केली आहे. कथित गैरव्यवहार केल्यामुळे (fraudulent activities) सेबीने ही कारवाई केली असून बाजारात सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्री करण्यास मनाई आहे. यामध्ये अनिल अंबानींसह अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश शाह यांचा समावेश आहे. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, SEBI कडे नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थांशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी किंवा कोणत्याही सार्वजनिक कंपनीचे कार्यवाहक संचालक/प्रवर्तकसोबत स्वतः संबंध जोडण्यास संस्थांना मनाई केली आहे, जे लोकांकडून भांडवल उभे करू इच्छित आहेत. पुढील आदेश येईलपर्यंत रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि अनिल अंबानींसह इतरांवर हे निर्बंध असतील.
माहितीनुसार, यासंदर्भात अनिल अंबानी आणि इतरांना आदेश प्राप्त झाल्यापासून २१ दिवसांचा वेळ दिला आहे. यामध्ये त्यांचे काही उत्तर किंवा आक्षेप असतील, तर त्यांना यासंदर्भात वैयक्तिक सुनावण्याची संधी सेबीकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी यांसदर्भात रिलायन्स होम फायनान्सचे जे शेअर्स आहेत, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळाला होता. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या शेअर्सची किंमती १.४० टक्क्यांनी घसरली होती.
दरम्यान याचवेळी, भांडवली बाजार नियामक सेबीने NSE आणि त्यांचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायणांसह इतरांवर दंड ठोठावला आहे. आनंद सुब्रमण्यन यांची ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालक (MD)चे सल्लागार म्हणून नियुक्ती करताना सिक्युरिटीज कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.