गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा काही प्रमाणात बंद आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.