अतिवृष्टीनंतर तुटलेला गावाचा संपर्क पूर्ववत करण्यात महिनाभरानंतरही प्रशासनाला अद्यापही यश आलेलं नाही. परिणामी वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने एका रूग्णाला जीव गमवावा लागल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे घडली आहे.
महिनाभरापूर्वी साताऱ्याच्या महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी भुस्सखलन,दरडी कोसळणे, छत कोसळून घरं भुईसपाट होणे आदी दुर्घटनांमध्ये ३७ लोकांचा मृत्यू झाला. अनेक गावे संपर्कहीन झाली असून एका महिन्यानंतरही हीच परिस्थिती कायम आहे. एकीकडे प्रशासन गतीने कामाला लागले असल्याचा सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकेड महाबळेश्वर पोलादपूर रस्ता बंद आहे. किल्ले प्रतापगडाच्या आजूबाजूच्या गावांची आणि कांदाटी खोऱ्याची, वाईच्या जोर खोऱ्याची परिस्थिती आजही भयावह आहे. यामुळे या परिसरातील आरोग्य व्यवस्था प्रभावीत झाली आहे. ताप, थंडी, सर्दी, खोकला आदी साथीच्या आजारांवर उपचार दुरापास्त झाले आहेत. तर, रस्ते नसल्याने उपचारांभावी रूग्णांचे हाल होत आहेत.
खरोशी (महाबळेश्वर)चे रामचंद्र मानू कदम हे आजारी होते. त्यांना रूग्णालयात नेण्यासाठीचा खरोशी गावाला चतुरबेट मार्गे महाबळेश्वरशीजोडणारा रस्ता बंद आहे. तर रेनोशी मार्गे कोट्रोशी पूलावरून तापोळ्याला जाणारा रस्ताही दरड कोसळल्याने बंद आहे. २२ ऑगस्टला झालेल्या पावसामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हे गावच संपर्कहीन झाले आहे. अद्याप या गावात प्रशासनाचा एकही अधिकारी आलेला नाही, असं सांगितलं जात आहे. तर, आत्तापर्यंत गावामध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ताच सुरु झाला नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
यातच शुक्रवारी खरोशी गावामध्ये दुःखद घटना घडली. रामचंद्र कदम (वय ७५) यांच्या छातीमध्ये कळ येत होती. मात्र त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध होत नव्हता. मोबाईल नेटवर्कही उपलब्ध नव्हते. त्यामुळे तापोळ्यातून स्पीडबोट सुद्धा मागवता आली नाही. अखेर बाजूच्या रेनोशी गावामधून ‘लॉन्च'(वाहतुकीसाठी वापरली जाणारी बोट) मागवण्यात आली. रामचंद्र कदम यांना डालग्यात बसवून ‘लॉन्च’पर्यंत नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोन ते अडीच तास गेले आणि कदम यांचा डालग्यातच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अद्यापपर्यंत गावात साधा ग्रामसेवक, तलाठीही आलेला नाही –
२२ जुलैच्या अतिवृष्टीनंतर शेती, रस्ते व घरांचे नुकसान झालेले असूनही अद्यापपर्यंत गावात साधा ग्रामसेवक, तलाठी ही आला नाही. दळण-वळण पूर्ण बंद आहे. प्रशासनाने आतातरी लक्ष देवून गावाच्या समस्या सोडवाव्यात. अशी मागणी खरोशीचे सरपंच प्रदीप शिंदे यांनी केली आहे.