लांजा येथे सरपंचावर हल्ला: शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण, ग्रामस्थ संतप्त

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचांना शासकीय कर्तव्य बजावताना मारहाण करून कामात अडथळा निर्माण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामवाडी येथील राम मंदिर रोडवर २९ मे रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेरवली बुद्रुक रामवाडी येथील सरपंच दुपारी राम मंदिर रोडवरील बंद केलेला डांबरी रस्ता लोकांच्या वाहतुकीसाठी खुला करत होत्या. शासकीय कर्तव्य बजावत असताना, स्नेहा संतोष भिंगार्डे (वय ५४), कुणाल संतोष भिंगार्डे (वय २५) आणि माधव शंकर कोळवणकर (वय ६२, सर्व रा. वेरवली बुद्रुक, रामवाडी, लांजा) यांनी त्यांना अडवले. आरोपींनी सरपंच आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकसेवक साक्षीदारांना दबाव टाकत परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यापुढे जाऊन, तिन्ही आरोपींनी सरपंच आणि सहकाऱ्यांवर हल्ला करत धक्काबुक्की केली आणि रस्ता पुन्हा दगड लावून बंद केला. यामुळे शासकीय काम पूर्ण होऊ शकले नाही.

या घटनेनंतर सरपंचांनी त्याच दिवशी रात्री ८.४७ वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गु.र.नं. ११०/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १३२, १२६ (१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ग्रामस्थांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*