राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या (पवार गट) रत्नागिरी युवती जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संख्या गुरुप्रसाद पोवार यांनी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

संख्या पोवार या राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होत्या. राजकारणामध्ये चांगलं काम करण्यासाठी सध्याच्या घडीला भाजपापेक्षा चांगला पक्ष कोणताच नाहीये. त्यामुळे  मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं, अशी प्रतिक्रिया संख्या पोवार यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपाने एक वेगळाच माहोल तयार केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत देखील दापोलीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

लवकरच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कोकणामध्ये आपली ताकद वाढवत आहे.

भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्याचं आश्वासन भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिलं आहे. भविष्यात तुम्हा सर्व महिलांना सन्मान देऊ, असंही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संयोजिकापदी निवडीची घोषणा केली.

मी पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. भाजपाला दापोलीमध्ये ताकद देण्याचं काम मी येत्या काळात करणार आहे. मी भाजपामध्ये कोणत्याही पदाच्या अपेक्षेने आलेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्विकारण्यास तयार आहे.

– संख्या पोवार