दापोली : ठाकरे गटाकडून हकालपट्टी झाल्यानंतर दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असून, कदम यांनी मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
माय कोकणला दिलेल्या विशेष मुलाखतीत कदम यांनी आपली भूमिका मांडली. “हकालपट्टीच्या पत्रकाबाबत माझ्याशी सल्लामसलत करायला हवी होती.
विनायक राऊत यांच्या नावाने पत्रक काढल्याने आश्चर्य वाटले,” असे कदम म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांसोबत प्रचार केल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतर कोणत्याही पक्षनेत्यांबाबत तक्रार नसल्याचेही नमूद केले.

“रामदास कदम यांच्याशी चर्चेबाबत कोणताही फोटो किंवा चर्चा नाही. मी पक्ष सोडत असल्याचे कोणत्याही माध्यमांना सांगितले नव्हते,” असे कदम यांनी स्पष्ट केले.
“हकालपट्टी झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलून पुढे काय करायचे याचा निर्णय घ्यायला हवा होता. लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसेना, भाजप की मनसे यापैकी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेईन,” असेही ते म्हणाले.