रत्नागिरी, मंडणगड, शिवसेना, संजय कदम, हृदयविकार, बूथप्रमुख, योगेश कदम, सामाजिक कार्य, पणदेरी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावचे शिवसेनेचे खंदे बूथप्रमुख संजय कदम यांचे गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले संजय कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रत्येक पक्षीय बैठकीत नियमित सहभागी होत.

त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबाचा आधार आणि दोन लहान मुलांचे पितृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे मंडणगड तालुक्यात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय कदम हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते. गावातील ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात राहावी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, शाळेचे दाखले काढणे यासारख्या कामांत ते लोकांना मार्गदर्शन करत.

उत्तम इलेक्ट्रिशियन आणि महावितरणच्या उपकंपनीत ठेकेदार म्हणून कार्यरत असलेले संजय कदम पणदेरी आणि परिसरात वायरमन म्हणून ग्रामस्थांना मदत करत.

वीजपुरवठा खंडित झाल्यास ते कोणत्याही वेळी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात.

दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शुक्रवारी (20 जून) सकाळी 11 वाजता पणदेरी येथे शोकाकुल वातावरणात संजय कदम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शिवसेना महिला आघाडीच्या विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे, विभागप्रमुख संजय शेडगे, इरफान बुरोंडकर, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव, युवा सेनेचे सिद्धेश देशपांडे, अनेक सरपंच आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. तालुक्यातील इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक मंडळाचे पदाधिकारीही अंत्यसंस्काराला हजर होते.