दापोली: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांना बेडही उपलब्ध होत नसल्याची स्थिती लक्षात घेता डॉ. प्रसाद आंबेकर यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथील म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधलेली इमारत खाजगी कोविड सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर श्री. समर्थ कोविड केअर सेंटर उद्यापासून दापोलीकरांच्या सेवेमध्ये रुजु होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक तीव्र होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात देखील सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ६१४ एवढी आहे. या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाणही पहिल्या लाटेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. मात्र, शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेत बेड कमी पडू लागले आहे.
दुसऱ्या लाटेत ही स्थिती निर्माण होऊ शकते, याचा अंदाज घेऊन डॉ. प्रसाद आंबेकर यांनी
दापोली नगरपंचायतीकडे केळसकर नाका येथील म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधलेली इमारत खाजगी कोविड सेंटरसाठी मिळावी याकरीता अर्जाव्दारे मागणी केली होती. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दापोली नगरपंचायत मुख्याधिकारी यांना सदरची जागा स्वामी समर्थ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाला कोविड सेंटरकरीता जागा देण्याचे आदेश दिले होते.
…अशी असेल व्यवस्था
दापोली नगरपंचायतीकडे केळसकर नाका येथील म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी असलेली इमारतीत हे सेंटर उभारले गेले आहे. या इमारतीत ३५ बेडची व्यवस्था असेल. त्यापैकी २४ ऑक्सिजन बेड, ०७ साधे बेड तर ०४ व्हेल्टिलेटर बेड असतील. आयसोलेशन स्वतंत्र विभाग, २४ तास डॉक्टर, नर्सेस, रक्ततपासणी आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. एकाच छताखाली व्यवस्था असल्याने सर्व रुग्णांवर लक्ष ठेवता येईल.
दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून कोविडच्या या भयंकर महामारीत आमचे कोविड केअर सेंटर चांगली सेवा देऊन आदर्श निर्माण करेल. सद्य:स्थितीत रुग्णांची गरज ओळखून कोविड सेंटर उभारत आहोत. रुग्णांचा जीव वाचला पाहिजे ही भूमिका असून, रुग्णांनी लक्षणे जाणवताच चाचणी करून दाखल व्हावे.
-डॉ. प्रसाद आंबेकर
एम.डी. (भुलतज्ञ)