इंडिगो एअरलाईन्सचा देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोनदा पगारवाढीचा निर्णय

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा पगारवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर घेण्यात आला, अशी माहिती अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही वर्षांपासून विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या न्याय्य मागण्या पक्षाकडे मांडल्या होत्या.

यानंतर, भाजपने कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन समितीशी सातत्याने चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने, गेल्या काही महिन्यांपासून व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेण्यात आल्या.

अखेर, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून इंडिगो एअरलाईन्सने मुंबई, गोवा आणि देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा पगारवाढ देण्याची भाजपची मागणी मान्य केली.

यामुळे कर्मचाऱ्यांवरील गेल्या काही वर्षांपासूनचा अन्याय दूर झाला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने नेहमीच कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी झालेल्या चर्चेतून हा यशस्वी तोडगा निघाला असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला चांगली पगारवाढ मिळेल, याची काळजी घेण्यात आली आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर प्रलंबित प्रश्नांवरही व्यवस्थापन समितीशी चर्चा सुरू राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, इंडिगो एअरलाईन्स कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष करण कांबळे, सचिव दिनेश शेवाळे, चंदन कडू, सिराज हाशमी, शैलेश पवार, देवेंद्र पोळ आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*