रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध झाले होते. तर सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकारच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली. तर दोघांना पराभव पत्करावा लागला.
विरोधी दोन उमेदवार या रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाले आहेत. विद्यमान तीन संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव, लांजा तालुका भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहेत.

जिल्हास्तरीय विमुक्ती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे यांना 692 मते, सचिन चंद्रकांत बाईत यांना 164 मते मिळाली. कांबळे 528 मतांनी निवडून आले. जिल्हास्तरीय मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते यांना 48 मते, राकेश श्रीपत जाधव यांना 45 मते मिळाली. विद्यमान संचालक मोहिते केवळ तीन मतांनी निवडून आले आहेत.

जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज यांना 66 मते, ॲड. सुजित भागोजी झिमण यांना 56 मते मिळाली. विद्यमान संचालक श्री. रेडिज 10 मतांनी निवडून आले आहेत. जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण यांना 10 मते, अजित रमेश यशवंतराव यांना 25 मते मिळाली. श्री. यशवंतराव 15 मतांनी निवडून आले आहेत.

रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील यांना 33 मते, प्रल्हाद महादेव शेट्ये यांना 8 मते मिळाली. श्री. पाटील 25 मतांनी निवडून आले आहेत. लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना 16 मते, महेश रवींद्र खामकर यांना 18 मते मिळाली. भाजपा तालुकाध्यक्ष श्री. मुन्ना खामकर केवळ दोन मतांनी निवडून आले आहेत.

गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी यांना 13 मते, चंद्रकांत धोंडू बाईत यांना 8 मते मिळाली आहेत. श्री. जोशी 5 मतांनी निवडून आले आहेत. विद्यमान संचालक चंद्रकांत बाईत, गणेश लाखण, आदेश आंबोळकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे.
सहकारचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे, निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 वाजता जिल्हा नगर वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मतमोजणीला प्रारंभ झाला. दोन तासात सात मतदारसंघातील मतमोजणी संपुष्टात आली.