खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर मोरवंडे येथे ट्रकच्या धडकेत २६ वर्षीय इंटिरिअर डिझायनरचा मृत्यू झाला आहे. शुभम सुदाम काणेकर असं मयत तरुणाचं नाव आहे.
खेड तालुक्यातील मोरवंडे सुतार वाडी येथील सुदाम काणेकर यांचा शुभम द्वितीय पुत्र होता. तो भरणे येथून घराकडे निघाला होता.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर आला तेव्हा समोर निघालेल्या ट्रक घाटातील तीव्र चढामुळे अचानक पाठीमागे आला.
या ट्रकची धडक दुचाकीस बसली आणि शुभम हा जखमी झाला होता. मदतकर्त्यांनी त्याला भरणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
सुदाम यांचा शुभम हा हुशार मुलगा होता. आपल्या हुशारी आणि जिद्दीने त्याने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली होती. अनेक बांधकाम विकासकांसह खासगीमधील कामे त्याने वेळेवर पूर्ण केली होती.
घरामधील गरीब परिस्थिती तो झटकू पाहत होता. बोलायला चुणचुणीत असलेल्या शुभमच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच अनेक जणांनी दुःख व्यक्त केले आहे.