रत्नागिरी:- मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे माजी जनरल सेक्रेटरी अ.शकुर इब्राहिम चिलवान (वय ७८) यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.
शनिवारी रात्री त्यांना हृदविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र आज सोमवारी सकाळी त्यांचे देहावसान झाले.
निधनाची बातमी समजताच सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल मधील अध्यापनाचे काम थांबवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
जवळपास १४ वर्षे त्यांनी संस्थेचे जनरल सेक्रेटरीपद भूषविले. सन २००७ ते २०२१ या कालावधीत त्यांनी संस्था व शाळेच्या चौफेर प्रगतीसाठी योगदान दिले
या कालावधीत शाळेला स्कूल बस घेतली. संपुर्ण शाळा दुरूस्तीचे काम केले. शाळेबरोबरच गावातील प्रत्येक सामाजिक कामात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असे.
सन १९६३-१९६४ या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅचमध्ये ते प्रथम आले होते. अत्यंत पारदर्शक कामकाजामुळे ते सर्वपरिचित होते.
शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची त्यांची खासियत होती. सतत शाळेच्या प्रगतीबाबत ते आग्रही होते.
अनेक वर्षे परदेशात राहिल्याने ते शिस्तप्रिय होते. सर्वधर्मसमभावाचा आग्रह धरणारे होते. शाळेच्या व संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध केला.
त्यांनी आपल्या जीवनातील अमुल्य वेळ शाळेसाठी दिला. सैतवडे गावातही अनेकांच्या अडचणीतच्या काळात ते धावून जात. त्यांच्या अचानक जाण्यामुळे गावाची, शाळेची आणि संस्थेची फार मोठी हानी झाली आहे.