नगरसेवक सचिन जाधव शिवसेनेत, राष्ट्रवादीला झटका

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये एन्ट्री घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सचिन जाधव सध्या नाराज होते. पक्षाच्या प्रक्रियेमध्ये विश्वासात घेतले जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्याचबरोबर ज्येष्ठ असून सुद्धा निर्णय प्रक्रियेमधून डावललं जात असल्याचे देखील त्यांचं म्हणणं होतं. या सगळ्याला कंटाळून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेनेमध्ये त्यांच्या जाण्याने येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला नक्कीच फायदा होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

दापोली नगरपंचायतीमध्ये सचिन जाधव हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले होते. दापोली नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक तर ते आहेतच, शिवाय त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून देखील काम केलं आहे. काही काळ ते प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

सचिन जाधव सुरूवातीला काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये त्यांनी चांगला जम बसवला होता. पण आता त्यांनी पुन्हा एकदा पक्षबदल करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

येत्या दोन महिन्यांमध्ये दापोली नगरपंचायतीची  टर्म संपत आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशातच त्यांचं शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा झटका मानला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे आता औत्सुक्याचं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*