खेड : रत्नागिरी जिल्हा एस. टी .कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते प्रणित स्वाभिमानी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलचा धुव्वा उडवत महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलमधील ११ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत.
रत्नागिरी एस.टी. कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली.
मतमोजणीत कामगारांनी सदावर्ते पॅनलला नाकारून मान्यताप्राप्त संघटनेच्या बाजूने कौल दिला आहे.
एस. टी. बँक निवडणुकीत सदावर्तेनी आमिषं देऊन खोटं बोलून सत्ता मिळवली होती. मात्र, या बॅंकेचं वाटोळं केल्याने कामगारांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती.
मागील काही दिवसात बँकेत झालेली नियमबाह्य कर्जवाटप, बेकायदेशीर नियुक्त्या, स्विकृत सदस्य म्हणून गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना जनरल मीटिंग मध्ये घेतलेले ठराव, नथुराम गोडसेचा फोटो म्हणून वाद वाढत चालले होते.
या अशा निर्णयामुळे कामगार त्रस्त झाला होता. हक्काचे कष्टाचे पैसे बँकेत काढायला बंदी आल्यामुळे कर्मचारी संतप्त होते.
या सर्वांचा परिणाम तसेच जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदिप शिंदे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून रत्नागिरी येथील कामगारांनी निवडणुकीत संघटनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
तसेच रत्नागिरी विभागाचे सचीव रवी लवेकर, अध्यक्ष राजू मयेकर, शेखर सावंत, संदेश सावंत यांच्यासह अनेक हात या निवडणुकीत राबत होते.
संघटनेच्या कामाच्या बळावर मान्यताप्राप्त संघटनेने रत्नागिरी पतसंस्थेच्या निवडणुकीत आरिफ काझी, अनिल चव्हाण, अभय जुवले, राजेंद्र पाटोळे, समीर शिंदे, निलेश इंदुलकर, रमेश राठोड, उमेश खेडेकर, मनाली साळवी, दिप्ती झेपले आदी उमेदवार निवडून आले.
संघटनेचे पॅनल निवडून येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष आपला विजय साजरा केला.