औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला. या दौऱ्यात विविध ठिकाणच्या मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाच्या त्यांच्या मागण्या जाणून घेणं हा मुख्य हेतू त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. आपण पदाचा राजीनामा देण्याने समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर तसंही करण्यास सज्ज असल्याची तयारी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. सध्याच्या घडीला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं यासाठी संभाजीराजे आग्रही दिसले. यावेळी राज्य शासनाने मराठा समाजाला न्याय द्यावा असं म्हणताना मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपनं दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देणं मात्र त्यांनी टाळलं.