दापोली : आरपीआय पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनिल जाधव यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाच्या नेत्यांकडे दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय पक्षावर अन्याय झाल्याचे म्हणत त्यांनी पक्ष सोडत असल्याचं आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
त्यांनी पक्ष नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की, महायुतीच्या माध्यमातून आरपीआय पक्षाला एकही जागा मिळाली नाही.
जी एक जागा मुंबईमध्ये देण्यात आली आहे ती सुद्धा भाजपच्या तिकिटावर लढवली जाणार आहे. त्यामुळे आरपीआयला एक जागा सोडली आहे, असं जे चित्र भासवलं जात आहे ती निव्वळ धुळफेक आहे, असेही या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
यामुळे पक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे असं म्हणत वरिष्ठ नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावं अशी विनंती ही त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर दापोली तालुका कार्यकारणी आणि जिल्हा नेतृत्वावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
जिल्हा प्रवक्ते अनिल गुणाजी जाधव, माजी दापोली तालुका सरचिटणीस सुरेश धोंडू मोरे, माजी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुरेश दत्ताराम चाफे,
माजी युवक अध्यक्ष विरेंद्र विलास मोरे, युवक आघाडी उपाध्यक्ष संतोष काशिराम शिर्के निलेश विष्णु रुके, पंकज प्रमोद मोरे, नितीन सुरेश महाडीक, वाईत दाऊद ऐनरकर, तुषार अनंत मोरे, दिलीप सजन जाधव या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठान पर्यंत आपल्या मनातली खदखद पोहोचवली आहे. वरिष्ठ या पत्राची कशाप्रकारे दखल घेतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागलं आहे